न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) पीएमपीएमएलची बैठक स्वारगेट येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत महापौर राहूल जाधव उपस्थित होते. १२५ गाड्या भाडे तत्वावर चालवायला देण्यात येणार आहेत. ४४० सीएनजी बस खरेदीच्या विषयाला देखील मान्यता देण्यात आली. तसेच, पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना अंशदान वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी ती सुविधा बिर्ला, निरामय, मॅक्स, सुर्या या रुग्णालयांत देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विषयाला मंजुरी दिली, असे महापौर जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
तसेच माजी सैनिकांच्या महिलांनी सुरू केलेल्या महिला बचत गटाला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून बसेस चालवायला घेतल्या जाणार आहेत. त्याबदल्यात त्यांना मोबदला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे त्या बसवर माजी सैनिकच चालक म्हणून काम करतील, अशी सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे माजी सैनिकांबरोबर महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल. या विषयाला बैठकीत मंजुरी दिली आहे, असे जाधव म्हणाले.
येत्या ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड मधील महिलांना तेजस्विनी बसने एक दिवस विनाशूल्क प्रवास करता येणार आहे. तेथून पुढे प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला शहरातील महिलांना तेजस्विनी बसने विनाशूल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच, प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला पीएमपीएमएलची आढावा बैठक पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेतली जाणार आहे, याच्याही ठरावाला मान्यता देण्यात आली, अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.











