न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- विविध विकास कामांच्या माध्यमातून शहराचा विकास होत असून, या विकासातूनच स्मार्ट शहर करण्याचा प्रयत्न असल्याचे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ४ मधील बोपखेल येथे विकसित करण्यात येणा-या उदयानाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नगरसदस्य विकास डोळस, लक्ष्मण उंडे नगरसदस्या
हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, माजी नगरसदस्य भाऊसाहेब सुपे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी महापौर राहूल जाधव म्हणाले, बोपखेल गावाकडे दूर्लक्ष होणार नाही. बोपखेल वासियांचा जिव्हाळयाचा ज्वलंत प्रश्न पूलाचा आहे. सुमारे ५३ कोटीची निविदा काढण्यात आली होती परंतू, निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने काम करता आले नाही. परंतू निवडणूकीनंतर लगेच पूलाचा प्रश्न सोडविणेत येईल असेही ते म्हणाले.
नगरसदस्य विकास डोळस म्हणाले, दोन वर्षाच्या कार्यकाळात सुमारे १०० कोटींची विविध विकासकामे दिघी बोपखेल या भागासाठी मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच पूलाचे काम सुरु होईल. या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबध्द आहोत.
नगरसदस्या निर्मला गायकवाड म्हणाल्या, पाण्याच्या टाकीचे काम शाळा आदी विकास कामे नागरीकांच्या सहकार्याने केली आहेत. यापुढेही आम्ही नागरीकांसाठी सदैव तत्पर आहोत. नगरसदस्या हिराबाई घुले यांनीही मनोगत व्यक्त केले. नगरसदस्य लक्ष्मण उंडे म्हणाले दिघी बोपखेल या भागासाठी सर्व सदस्यांनी एकत्र प्रयत्न केले आहेत. यापुढेही एकत्र येवून विकासकामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
नगरसेवक डोळस यांनी सांगितले की, सुमारे ३.२१ एकर मध्ये उदयान विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये ४५० मीटर लांबीचा व २ मीटर रुंदीचा पाथवे, चिल्ड्रेन प्ले एरिया, लॉन एरिया,टॉयलेट,पार्किंग, ओपन जिमसाठी जागा व रिव्हर फ्रंट सिटींग करण्यारत येईल. प्रकल्पास सुमारे ३ कोटी ३४ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, नोव्हेंबर २०२० अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे बोपखेल परिसरातील नागरीकांना याचा लाभ होणार आहे.











