न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- चूल आणि मूल ही म्हण विसरुन पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून, समाजामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. मनपाच्या वतीने महिलांसाठी विविध प्रकारची शिबिरे व प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न मनपाचे वतीने केले जात आहे. असे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त कै. अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ माँसाहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने
करण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, महिला व बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, शिक्षण समितीच्या सभापती प्रा.सोनाली गव्हाणे, नगरसदस्या उषा ढोरे, साधना मळेकर, प्रियंका बारसे, यशोदा बोईनवाड, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, सहाय्यक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे तसेच व्याख्याते अशोक देशमुख व सत्कारमुर्ती आदिती निकम यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असेही महापौर राहूल जाधव म्हणाले.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्विनल म्हेत्रे म्हणाल्या, महिला ही नवी पिढी तयार करण्याची ताकद आहे. ती कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाही. जिजाऊ माँसाहेब सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेवून मुलींना शिकवा, प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दया. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपा नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत सावित्रीबाई फुले पुरस्कार आदिती निकम यांना महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास महिलांची विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. सुत्रसंचालन बी.के. कोकाटे यांनी केले.











