- शेकडो कुटुंबावर हायटेन्शची टांगती तार कायम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- चिंचवडेनगर, बिजलीनगर या परिसरासह शहरातील अनेक भागात हायटेन्शन विद्युत लाइनने अनेकांचे टेन्शन वाढविले आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या हायटेन्शन वायरखाली अनेकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे येथील शेकडो कुटुंबावर हायटेन्शची टांगती तार कायम आहे.
पिंपरी – चिचवडचे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. २००४ मध्ये १२ गावांचा महापालिकेत समावेश झाला. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराला विजेची मोठी गरज ओळखून हायटेन्शनचे शहरात जाळे निर्माण झाले. शहराजवळ गावे आल्याने येथे शेतीमध्ये ले आउट पाडण्यात आले. अनेकांनी शहराजवळ असल्यामुळे भूखंड घेतले. शहरातील अनेक भागात शेकडो खांब रस्त्यावर आहेत. काढण्याचे काम पूर्वी महापालिका स्वखर्चाने करीत होती. मात्र त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊ लागल्याने आता केवळ अत्यावश्यक आहे त्याच ठिकाणी महापालिका स्वखर्चातून भूमिगत केबल टाकण्याचे काम करते. चिंचवडेनगर, बिजलीनगर आदी परिसर प्राधिकरणात मात्र या जमिनी प्राधिकरणाने ताब्यात घेतल्या नाहीत. त्यामुळे जमीन मालकांनी या जागा परस्पर विकल्या.
हायटेन्शनखालची जागा स्वस्तात मिळाल्याने अनेकांनी थेट हायटेन्शन लाइनखालीच घरे बांधली. भूखंडांचा विकास करताना हायटेन्शन लाइन खालील भाग वगळने अपेक्षित असते. शासनाने भूमिगत वाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात भूमिगत केबल टाकण्यात आले. मात्र, काही ठिकाणी हायटेन्शन लाइन भूमिगत करण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे काही भागात हायटेन्शन लाइन जशाच्या तशाच आहेत. बिजलीनगर, चिंचवडेनगर येथील घरे हायटेन्शन लाइनच्या प्रभावाखाली आहेत.