- शिव-फुले-शाहु-आंबेडकर महापालिका कर्मचारी मंचाचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ अ ’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पिंपरी कॅम्पमध्ये गुरूवारी (दि. १२) वरिष्ठांच्या आदेशानुसार व नियमानुसार शिस्तीत कारवाई केली होती. नेहमीच येथील व्यापारी वर्ग हा महापालिकेच्या बहुतांशी कोणत्याही धोरणाला विरोध करतच असतो. यालाच अनुसरुन गुरुवारी देखील महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला कारवाई करण्यास विरोध केला. उलटपक्षी कर्मचाऱ्यावर दादागिरीची भाषा करत कर्मचाऱ्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मनपा कर्मचाऱ्यांनी संयमाची भुमिका बजावली.
अतिक्रमणामुळे नागरीकांना व प्रवाशांना वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अडथळा व समस्यांला सामोरे जावे लागत असल्याचे विनंतीपुर्वक व्यापाऱ्यांना सांगितले. तशा अनेकदा नागरीकांच्या देखील तक्रारी महापालिका प्रशासनाकडे येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु, तेथील कोणतेच व्यापारी पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या विनंतीस व कारवाईस प्रतिसाद देत नव्हते. शेवटी आदेशासी व कर्तव्याशी बांधिल असलेले महापालिका मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्या कारवाईस सुरवात केली. पण नंतर काही राजकीय लोकांच्या मोबाईलवरील संभाषणानंतर व्यापारी वर्गानेच आक्रमक पवित्रा घेत मनपा कर्मचाऱ्यांनाच उध्दटपणे वागणूक देण्यास सुरवात केली. कर्मचाऱ्यावरच खोटे नाटे आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतला, असा आरोप शिव-फुले-शाहु-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी केला आहे.
वास्तविक याच व्यापारी वर्गाकडून आपल्या दुकानाबाहेरील रस्त्याच्या जागेवर छोट्या-मोठ्या पथ विक्रेत्यांना जागा भाड्याने देऊन भाडे वसुल करण्याचा देखील व्यवसाय केला जातो. भाडे बंद पडेल या भितीने व्यापारी वर्गाने खरे पाहता चुकीचे आरोप करत आंदोलन केले होते, अशी चर्चा त्यांच्याच व्यापारी वर्गामध्ये चर्चेली जात आहे. यामध्ये नाहक व विनाकारण मनपा कर्मचारी वर्गाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणे म्हणजे चोराच्या उलटया बोंबा असा हा प्रकार आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबद्दल कोणतीही शंका न घेता व परिस्थितीची खातरजमा करुन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मागणी शिव-फुले-शाहु-आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
खरे कारण तर वेगळेच आहे…
सध्या महापालिकेच्या कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांकडून टॅक्स वसुलीची जोरदार मोहिम सुरु केली आहे. बहुतांशी कॅम्पमधील व्यापारी वर्ग हा महापालिकेचा कर विभागाचा टॅक्स भरत नाही. पण सध्य परिस्थीतीला कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख व पिंपरी झोनचे कर्मचारी यांनी वसुलीसाठी कडक कारवाई सुरु केली असल्यामुळे शहरातील इतर थकबाकीदारा बरोबरच कॅम्पमधील व्यापारी लोक देखील सतंप्त झाले आहेत. कॅम्पमधील याच व्यापारी वर्गाकडे टॅक्स विभागाची आंदाजे ५० कोटी पेक्षा जास्त थकित रक्कम आहे. जेव्हा जेव्हा टॅक्स विभागाचे कर्मचारी या ठिकाणी टॅक्स वसुली करण्यासाठी जातात त्यावेळी या व्यापरी घटकाकडून राजकीय दबावतंत्राचा वापर करत कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन पळवून लावले जाते. मागील काही महिण्यापासून कॅम्पमधील अनेक थकबाकीदारांचे दुकाने सील करण्याची मोहिम सुरु आहे. याचाच राग मनात धरुन येथील व्यापारी वर्गाने महापालिकेच्या अतिक्रमण पथकाच्या कारवाईला तीव्र विरोध करत एक पक्रारे टॅक्स वसुल मोहिेमेलाच विरोध करण्याचे षडयंत्र केले आहे. यामुळे महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या धेय व धोरणानुसार कर्तव्याशी एकनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे. जर कर्मचारी कर्तव्यात कसुर करत असेल तर त्याला निश्चितच शिक्षा करावी.
मा. संजय (बापू) जगदाळे – अध्यक्ष, शिव-फुले-शाहु-आंबेडकर विचार कर्मचारी मंच…