न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- घर खरेदी-विक्रीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रियल इस्टेट एजंटांना आता ‘महारेरा’चे व्यावसायिक प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे. तरच ते अधिकृत व्यवसाय करू शकतील. अशा एजंटांना आता दि. १ मेपासून हे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दि. १ सप्टेंबरनंतर या प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय करता येणार नाही, असे आदेश महारेराने काढले आहेत.
या व्यवसायात आता पारदर्शकता येण्यास मदत होणार असून, फसवणुकीच्या घटना रोखणे शक्य होईल. शिवाय रियल इस्टेट एजंटची तक्रार महारेराकडे करता येणार आहे. सध्या राज्यभरात असे ३८ हजार ७७१ नोंदणीकृत रियल इस्टेट एजंट आहेत.
रियल इस्टेट क्षेत्रात व्यावसायिकता, उत्तरदायित्व आणि सक्षमता आणण्यासाठी महारेराचा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याच्या कलम ९ नुसार प्रत्येक रियल इस्टेट एजंटने महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्लॉट, अपार्टमेंट, युनिट किंवा इमारतीची विक्री किंवा खरेदी करण्यापूर्वी महारेराकडे नोंदणी करणे असणे आवश्यक असते. रियल इस्टेट एजंट हा घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांमधील दुवा असतो. घर खरेदीदारांना प्लॉट खरेदीच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते. यासाठी एजंटांनाच रियल इस्टेट व्यवहारांची सर्व माहिती असणे आवश्यक असते. ते प्रशिक्षित असतील तर भविष्यातील गैरसमज आणि विवाद टाळता येतील. त्यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठी महारेराने प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमामुळे रियल इस्टेट एजंटच्या कार्यपद्धतींमध्ये सुसंगतता व कायदेशीर चौकटीत राहून त्यांना काम करता येईल.
महारेराने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल गव्हर्नन्सच्या मदतीने हा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक, रियल इस्टेट एजंट यांच्याशी २ वर्षे सल्लामसलत करण्यात आली. हा अभ्यासक्रम ऑनलाइन, ऑफलाइन अर्थात प्रत्यक्ष किवा दोन्ही पद्धतीने एजंटांच्या सोयीनुसार राबविला जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ही संस्था याची ऑनलाइन परीक्षा घेईल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या एजंटांना योग्यतेचे प्रमाणपत्र दिले जाईल.
या निर्णयामुळे ग्राहकांची फसवणूक टळेल. तसेच रियल इस्टेट एजंटांनाही ग्राहकांशी संवाद साधताना मदत होईल.
– अभिजित सब्बरवार, उपाध्यक्ष, प्रॉप असोसिएशन…