न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या २१ वाहनांचा ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात २ ते १५ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
जाहीर ई-लिलावात बस, एचजीव्ही, एमजीव्ही, एलजीव्ही, पीक अप, टुरिस्ट टॅक्सी व रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसीलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे. २ ते १० फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत https://eauction.gov.in/eauction/#/ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे.
नोंदणीनंतर २ ते १३ फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रुपये अनामत रकमेचा धनाकर्ष ”डीवाय आरटीओ पिंपरी चिंचवड” या नावे सादर करावा. सोबत ऑनलाइन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी व मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.