- भाजपकडून संभाव्य उमेदवार अश्विनीताई जगताप यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता?..
- तसे झाल्यास महिला उमेदवाराच्या विरोधात पुरुष मंडळी उभे ठाकणार?..
- सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे सर्वसमावेशक चेहरा असणाऱ्या महिला उमेदवाराची कमतरता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागेसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात येईल. दिवंगत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी (दि १८) रोजी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. अद्याप चार दिवस उलटून देखील सर्वच पक्षांच्या गोटात निवडणुकीबाबत भयाण शांतता दिसते. प्रक्ष प्रमुखांकडून पोट निवडणूकीला सामोरे जायचे की निवडणूक बिनविरोध करायची याबाबत साधी प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात आलेली नाही. दुसरीकडे कार्यकर्ते दंड थोपटून मैदान लढविण्याची भाषा करताना दिसून येत आहेत.
शहर राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शुक्रवारी निवडणूक लढविण्याबाबत कार्यकर्त्यांची चर्चा झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणुक लढविण्याचा ठराव बैठकीत पदाधिकाऱ्यांनी एकमताने पारित केला. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना गटाकडून देखील भाजपचा माज उतरविण्यासाठी निवडणूक लढवायला हवी, अशी मागणी होतेय. खुद्द पक्षाच्या शहरप्रमुखांनी तशी मागणी केल्याची माहिती मिळतेय. दरम्यान भाजपचे पक्षश्रेष्ठी जगताप कुटुंबातील कोणा एकाला उमेदवारी देणार, ही काळ्या दगडावरची रेघ. दिवंगत आ. जगताप यांचे बंधू संभाव्य उमेदवार शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता तशी नाहीच. परंतु, दुसरीकडे आ. जगताप यांच्या पत्नी संभाव्य उमेदवार अश्विनीताई जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास इतर पक्षीयांकडून सहानुभूतीपूर्वक विचार होऊन उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध होईल, असा कयास राजकीय तज्ञ वर्तवित आहेत.
तसे न झाल्यास महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी संभाव्य उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या विरोधात महिला उमेदवार देणार? असा सवालही जाणकारांकडून उपस्थित होतोय. ऐनवेळी तशी जुळवाजुळव न झाल्यास भाजपच्या संभाव्य उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या विरोधात सद्यस्थितीतील इच्छुक उमेदवार शिवसेनेचे गत स्पर्धक राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे ही पुरुष मंडळी मैदानात उतरणार? असाही प्रश्न जाणकारांना पडलेला आहे. भाजपच्या विरोधात ऐनवेळी महिला उमेदवार देण्याचे ठरल्यास तिन्ही पक्षांकडे सद्यस्थितीत सर्वसमावेशक चेहरा असणाऱ्या महिला उमेदवाराची कमतरता भासतेय. त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडी मैदानातून काढता पाय घेत निवडणूक बिनविरोध करण्याचीच शक्यता अधिक आहे.
दरम्यान ३१ जानेवारीला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारीला आहे. तर, ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल.