न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- मोशीतील कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र, विद्युत यार्ड आदी कामे होत आहेत. नवीन बांधकामांसाठी कचरा डेपोतील कंपोस्टिंग शेड, स्टोअर रूम, मजुरांचे विश्रामगृह, प्रयोगशाळा ही जुनी बांधकामे पाडण्यात येणार आहेत. त्या प्रस्तावास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
शहरातील स्वच्छ मिशन अंतर्गत घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प मोशी येथे डीबीओटी तत्वावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाकरिता डेपोची जागा २१ वर्षे कालावधीसाठी दिली आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे २०८ कोटी ३६ लाख रुपये एवढी आहे. महापालिकेचे आर्थिक अनुदान म्हणून ५० कोटी रुपये प्रकल्पाच्या विविध टप्प्यावर देण्यात येणारआहेत. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज विद्युत मंडळास विकावी अथवा महापालिकेला देण्याची तयारी असल्यास त्यासाठी पाच रुपये प्रति युनिट दराने महापालिकेस उपलब्ध करून द्यावी, असे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या कामास परवानगी दिली आहे. बांधकाम सुरू करण्याचा दाखलाही दिला आहे. मंजूर बांधकाम परवानगी नकाशाप्रमाणे प्रकल्पाचे प्रशासकीय कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र आदी कामांची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन बांधकामे करण्यात येणार असल्याने ही जुनी बांधकामे पाडावी लागणार आहेत.
सध्या या ठिकाणी जुने कंपोस्टिंग शेड, स्टोअर रूम, मजुरांसाठी विश्रामगृह, प्रयोगशाळा अस्तित्वात आहे. मात्र, नवीन बांधकामे करण्यात येणार असल्याने ही जुनी बांधकामे पाडावी लागणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम परवानगीनुसार, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी नवीन प्रशासकीय कार्यालय उभारणे आणि इतर सुविधा तयार करण्यासाठी जुनी बांधकामे पाडण्यात येणार आहेत. त्यास स्थायी समिती सभेत प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली.
















