न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- महापालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक, उद्योग, साठा आदी आस्थापनांची महापालिकेकडे नोंद करणे आवश्यक असते. मात्र, शॉपॲक्ट काढले की व्यवसायाची नोंद झाली, अशी धारणा व्यापाऱ्यांमध्ये आहे. परिणामी शहरातील बहुतांशी आस्थापनाधारकांनी महापालिकेकडे नोंदच केली नसल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिकांनी महापालिकेकडे नोंद करावी, यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागांकडून सर्वेक्षण करून त्यांच्याविरुद्ध नोटीस काढणार असल्याचा इशारा उपायुक्त सचिन ढोले यांनी दिला.
महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या आस्थापनांची नोंद महापालिकेकडे करण्याचे २०१६ पासून बंधनकारक आहे. शॉपॲक्ट काढले की व्यवसायाची नोंद झाली, अशी व्यापाऱ्यांची धारणा असते. त्यामुळे त्यांनी आस्थापनाचा महापालिकेकडून परवानाच काढलेला नाही. या आस्थापनांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी परवाना नवीन काढणे व नूतनीकरण एप्रिल महिन्यात करावा लागते. मात्र, यावर्षी जूनपर्यंत त्याला मुदतवाढ दिली आहे.
महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने २०१६ ला सर्वेक्षण केले. त्यात उद्योगधंदे, व्यवसाय व साठा परवाना या तीन प्रकारात विभागणी केली. त्यात ४५ प्रकारच्या व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. त्यासाठी परवाना काढणे आवश्यक होते. परंतु या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असून, सर्वेक्षण केल्यानंतरच किती व्यवसायांना परवाना काढावा लागेल हे स्पष्ट होणार आहे.
व्यवसायानुसार परवाना नोंदणी शुल्काची वर्गवारी करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक आस्थापनांचा जीआयएस पध्दतीने सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यातील ज्या आस्थापनांची नोंद करण्यात आली नाही. त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. यातून महापालिकेचा महसूल वाढविणे हेच ध्येय आहे. – सचिन ढोले – उपायुक्त, महापालिका…