- श्री संत तुकाराम महाराज संस्थानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- तीर्थक्षेत्र भंडारा डोंगरावरील सुरू असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज माघ दशमी सोहळ्या कार्यक्रमानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहूतील मुख्य मंदिरामध्ये श्री विठ्ठल-रुक्माई आणि संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले. देहूतील शासकीय गायरानाची ४६ एकर जागा संस्थेसाठी आरक्षित करावी, अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानने मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दौऱ्याच्या नियोजित वेळेत बदल झाल्याने सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा प्रथम भंडारा डोंगराकडे रवाना झाला. त्यानंतर त्यांचा ताफा देहूत आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले त्यांच्यासोबत उपस्थित होते. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांनी त्यांचा सन्मान केला.
त्यानंतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी सर्वे नंबर ९७ मधील शासकीय गायरान जमिनीतील ४६ एकर जागा संस्थांसाठी आरक्षित करावी अशी मागणीची निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले. देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष शितल हगवणे, नगरसेविका सपना मोरे, पौर्णिमा परदेशी, पुनम काळोखे, प्रियंका मोरे या सर्व उपस्थित नगरसेवक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले.












