न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२२) :- खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांनाही आता टोलचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. टोलनाक्यावर बुधवार दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून सर्व स्थानिक वाहनांकडून ही टोलवसुली करण्यात येणार असल्याची माहिती टोलनाका व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी २०२० शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने त्याचबरोबर अन्य राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये आंदोलकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन संचालक सुहास चिटणीस, पुणे सातारा टोल रोड प्रा. लि. चे खेड शिवापूर येथीलव्यवस्थापक अमित भाटिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा होऊन पुढील मार्ग निघत नाही तोपर्यंत एम एच १२ व एम एच १४ च्या सर्व वाहनांना टोल माफी देण्यात येईल, असे पत्र दिले होते. मात्र, दिलेला शब्द या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे व टोलनाका प्रशासन यांच्याकडून फिरविण्यात आला. त्यावेळी झालेल्या आंदोलनामुळे नागरिकांना टोल नाक्यावरती सवलत देण्यात येत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराला टोलमुक्तीतून वगळण्यात आले होते व त्यांच्याकडूनही टोल वसूल करण्यात येत आहे.
एनएचएआय व रिलायन्स इन्फ्रा यांनी आंदोलकांना टोलमाफीसंदर्भात जो काही शब्द दिला होता, तो त्यांनी फिरवला, तर स्थानिकांचा उद्रेक होईल आणि पुढील घटनेला संबंधित प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे माउली दारवटकर यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेला आहे.
सर्वसाधारणपणे खेड शिवापूर टोलनाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघांमधील १३० गावांतील नागरिकांनी स्थानिक मासिक पास काढून घ्यावेत व टोल प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खेड शिवापूर टोल नाका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले असून, स्थानिक पास ३१० रुपयांना उपलब्ध आहे.












