न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२२) :- पीएमआरडीएने हवेली तालुक्यातील वडाचीवाडी येथील १३४.७९ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक नगररचना (टीपी) योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जमीन मालकांसोबत झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. एकूण जमिनीच्या ५० टक्के क्षेत्रावर १४८ विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे वडाचीवाडी टीपी योजनेच्या कामाला गती मिळणार आहे.
या योजनेमध्ये सुमारे १७०० खातेदार शेतकरी असून त्यांची १३१.८४ हेक्टर जमीन आहे. तसेच २.९५ हेक्टर क्षेत्र नाल्याचे क्षेत्र योजनेत समाविष्ट आहे. त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृहयोजनांसाठी ११.७२ हेक्टर क्षेत्राचे नऊ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या योजनेत रस्त्यांसाठी सुमारे १९.२२ टक्के क्षेत्र राखीव असून त्यातील रिंग रोडसाठी ९.८३ हेक्टर व अंतर्गत रस्त्यांसाठी १५.५० हेक्टर, मैदानांसाठी ७ भूखंड, बागांसाठी ११ भूखंड, बालोद्यानासाठी ८ भूखंड, ग्रीन बेल्टसाठी २ भूखंड व २ खुल्या जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
नागरी सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र, भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, वीज उपकेंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, बसस्थानक, शॉपिंग सेंटर यांसाठीदेखील भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या नगररचना योजनेतून ६५ मीटर रुंदीच्या दीड किलोमीटर रस्त्यासाठी लागणारे सुमारे ९ हेक्टर ८३ आर. क्षेत्र ताब्यात येईल. योजनेचे या लवादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद रवींद्र जायभाये यांनी नुकतीच राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.












