- कोयत्याने संपूर्ण कुटुंबावर सपासप वार; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२२) :- किरकोळ भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीचे वडील व आरोपी यांच्यात वाद झाला होता. फिर्यादीच्या तोंड ओळखीचा सह आरोपी व त्याच्या अनोळखी मित्रांकडे कोयते व इतर तीन साथीदार हातात लाकडी बांबू घेऊन दोन दुचाकीवरून आले. फिर्यादीच्या घरासमोरील रिक्षाची व फिर्यादीच्या डिस्कव्हर गाडीची आरोपींनी तोडफोड केली. आरोपींच्या हातातील नंगे कोयते पाहुन परिसरामध्ये दहशत पसरली. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबास ‘ आता तुम्हाला सोडत नाही, एकाएकाला मारुनच टाकतो ‘ अशी धमकी देऊन शिवीगाळ करत फिर्यादीचे वडील जमशेद नदाफ यांना आरोपीने कोयत्याने हनवटीवर व डोक्याच्या मागील बाजूस वार करुन रक्तभंभाळ करीत त्यांना खाली पाडले. त्यावेळी फिर्यादीची बहीण सोडविण्यासाठी मध्ये पडली असता तीलाही आरोपी व त्याच्या साथीदारांनी कोयत्याने डोक्यावर वार केला. तसेच दुस-याने बांबूने तीच्या उजव्या हातावर, कोप-याजवळ मुक्का मार दिला, तसेच फिर्यादी यांचा भाऊ इर्शाद नदाफ हा त्यांना प्रतीकार करत असताना त्यालाही आरोपीच्या साथीदारांनी डोक्यावर, कोयत्याने वार केला व उजव्या हातावर बांबूने मारहाण केली. फिर्यादीच्या आईला उजव्या हाताला, डाव्या बाजूला, तोंडाला व पाठीवर मागील बाजूस बांबूने मुक्का मार देऊन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३०) रोजी रात्री ११.४५ वाचे सुमारास फिर्यादीच्या रहात्या घरासमोर, राधाकृष्णनगर,चक्रपानी वसाहत, ओम मंगल मेडीकल समोर, भोसरी येथे घडली. फिर्यादी जेद जमशेद नदाफ (वय १८ वर्षे, धंदा – दुकान, रा. भोसरी) यांनी आरोपी निखील पवळे, साहील मनोवर व त्याचे अनोळखी चार साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, १४१, १४३, १४७, १४८, १४९, क्रीमीनल लॉ अमेंडमेंट ३,७ भारतीय हत्यार कायदा ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.












