न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले होते की, तुमच्या सोबत किंवा तुमच्या परिसरात कोठे गुन्हा घडत असेल, तर पोलिसांना फोन करा. त्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचतील. त्यासाठी पोलीस ठाणे पातळीवर किमान दोन असे जलद प्रतिसाद पथक तयार करण्यात आले होते.
फोन येताच टीमने तेथे त्वरित पोहचणे अपेक्षित होते. त्यासाठी पिंपरीच्या एका चित्रपटगृहात आयुक्तांनी एक चाचणीही घेतली होती. मात्र नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला सोयीने घेतले. एखाद्या तक्रारदाराकडून पोलिसांना मदतीसाठी फोन केला असता पोलीस फोनवरच माहिती घेत होते व घटनास्थळी तास ते दोन तास उशीरा पोहचत होते. तर दुसऱ्या बाजूला नोंदवहीवर दहा मिनीटात पोहचले असा शेरा देत होते.
मात्र हा तक्रारींचा ओघ कमी होत नसल्याने आयुक्तांनी स्वतः याची पडताळणी केली असता सारा प्रकार उघडकीस आला. त्यांनी स्वतः तक्रारदारांशी संवाद साधला आणि काही ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत अथवा खूप उशीरा पोहोचल्याचे समोर आले. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सोमवारी (दि. ११) रोजी आयुक्तालयात संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बोलावून चांगलीच कानउघडणी केली. तसेच जे कर्मचारी कामचुकारपणा करत होते अशा ९१ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालयासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परेड करायला लावली.











