- ‘पन्नास खोके एकदम ओके वाल्यांना’ दाखवून द्यायचंय..
- अजित पवारांचा महाविकास आघाडी मेळाव्यात विरोधकांवर घणाघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- शिवसेना बाळासाहेबांनी काढली, ती मराठी माणसांना आधार देण्यासाठी. शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली. पानपट्टी, वडाप चालवणारे बाळासाहेबांमुळे आमदार, खासदार झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात दोन बंड झाले. मात्र गद्दारी करणारे पडले. तीन वर्षांपूर्वी आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम सुरु केलं. सुरुवातीला मत-मतांतरे होती पण, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येत काम केलं. दुर्दैवाने कोरोना आला. त्या दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या कामाची दखल न्याय व्यवस्थेने घेतली. परदेशात कौतुक झाले. त्या धक्क्यात असतनाच जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड करुन महाविकास आघाडी सरकार पाडले. उद्धवसाहेबांना त्यांच्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. आपल्या सगळ्यांची आता सटकली पाहिजे. त्याचा बदला या निवडणुकीत शिवसैनिकांनी घ्यायचा आहे. आता तिसरं बंड झालय. ‘पन्नास खोके एकदम ओके वाल्यांना’ दाखवून द्यायचं आहे. नाना काटे यांना निवडणून आणण्यासाठी सर्वांनी एक व्हावं, असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) २०५ चिंचवड विधानसभा पोट निवडणुकित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराकरिता वाल्हेकरवाडीत आज सोमवारी “महाविकास आघाडी संयुक्त मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे, आरपीआयचे राजेंद्र गवई, सचिन खरात, आमदार आण्णा बनसोडे, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष सचिन भोसले, शिवसेनेचे संतोष सौंदणकर, मित्रपक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजितदादा म्हणाले, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी माझ्यानंतर माझी जागा उद्धव सांभाळतील. आदित्य ठाकरे युवा नेतृत्व म्हणून काम करतील, असे सांगितले होते. आता हे सटरफटर स्वतःला शिवसेना प्रमुख समजू लागले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना हीच खरी उद्धव आणि आदित्य यांची शिवसेना आहे. त्यांना मानणारा मतदार आहे. त्या मतदाराला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांचे काम करायला लावायचे आहे. मतपरिवर्तन करायचं आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत काय होणार? आम्ही व्यवस्थितपणे जागांचं वाटप करू. सर्वांचं समाधान करू. ज्याची जशीजशी ताकद असेल तसे उमेदवार देऊ. पण आता आपल्यायला एकजूट दाखविल्याशिवाय पर्याय नाही. आपल्यामध्ये मताची विभागणी होता कामा नये. एक एक मत महत्वाचं आहे. रात्र आणि दिवस महत्वाचा आहे. गाफील राहू नका. नाराज, गैरसमज करू नका. आपल्यात अंतर पडू देवू नका. कोणी रुसू ,फुगू, नाराज होऊ नका, आपल्यायला जनतेला दाखवायचं. दोन्ही जागा निवडणून आणायच्या आहेत. इजा झाला, बिजा झाला आता तिजा दाखवायचा यांना. गद्दारांनी जे गालबोट लावलय त्यांना धडा शिकवायचा आहे.


















