न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- कर्मचाऱ्यांचे प्रश्नदेखील एकसारखे असल्याने नगरपालिकेच्या ४ लाख कर्मचाऱ्यांनीदेखील या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाचवेळी राज्य सरकार व महापालिका व नगरपालिकांचे एकूण २१ लाख कर्मचारी राज्य सरकार विरोधात संपावर जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनचा राज्यव्यापी मेळावा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्युनसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १५) पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडला.
या मेळाव्यात संपात सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच कामगार, कर्मचाऱ्यांविषय कोणतेही धोरण नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीत कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनी मतदान न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. राज्यभरातून हजेरी लावलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत फेडरेशनचे गौतम खरात यांनी उपस्थितांना दिली.
अशोक जाधव महणाले की, फेडरेशनचा कंत्राटी धोरणाला तीव्र विरोध आहे. नव्या कामगार संहितेमुळे महापालिका, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे म्हणाले, आज कोणत्याही राजकीय पक्षाला कामगारांविषयी विचारसरणी नाही. कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींमधील सर्व संघटनांची कृती समिती स्थापन करून, त्यांचा समावेश फेडरेशनमध्ये करण्याचे नियोजन आहे.
















