न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. या विभागामध्ये २७३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, फक्त ४० कर्मचारी आहेत. त्यामुळे बहुतांशवेळा मोठी आगीची घटना घडल्यास मर्यादा येतात. त्यावर महापालिका प्रशासनाने शिकाऊ कर्मचाऱ्यांच्या रूपाने तात्पुरता तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता शिकाऊ कर्मचारी अग्निशामक विभागाचा बंब रेटणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वेगाने विकास होत आहे. शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आग व इतर दुर्घटनेसाठी अग्निशामक दलाचे एकूण ३१ आगीचे बंब आहेत. या विभागास वर्षभरात १ हजार २०० पेक्षा अधिक वर्दी येतात. अग्निशामक विभागासाठी एकूण २७३ कर्मचारी (अग्निशमन विमोचक) आवश्यक आहेत. त्यापैकी सध्या केवळ ४० कर्मचारी उपलब्ध आहेत. या ४० कर्मचाऱ्यांवरच शहराचा संपूर्ण भार आहे.
शहरामध्ये कुठे आग लागल्यास या कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. शहराचा विस्तार होत असल्याने अनेकवेळा एकापेक्षा जास्त घटना एकाचवेळी घडतात. अशावेळी या कर्मचाऱ्यांवर ताण येतो. कामाचे वाढते स्वरूप पाहता या विभागामध्ये कर्मचाऱ्यांची भरती घडल्यास बचाव कार्यासाठी करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत महापालिका प्रशासनाने शिकाऊ कर्मचारी भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना मासिक २० हजार रुपये वेतन देण्यात येणार असून १२ महिन्यांसाठी नियुक्त केले जाणार आहे. त्यासाठी १० लाखांच्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.












