न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२३) :- तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली. व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष आहे.
व्याख्यानमालेत २३ फेब्रुवारी रोजी ‘मावळच्या प्राचीन लेण्यांचे वैभव’ या विषयावर व्याख्याते प्रा. डॉ. सत्यजीत खांडगे पहिले पुष्प गुंफणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष अनिश होले उपस्थित राहणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी ‘मावळचे दुर्ग वैभव’ विषयावर इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे दुसरे पुष्प गुंफतील. लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष मयूर राजगुरव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. २५ फेब्रुवारी रोजी लेखक ओंकार वर्तले ‘मावळचे पुरातन मंदिर वैभव’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
ही व्याख्याने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहात दररोज सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहेत. मावळच्या भौगोलिक इतिहासाच्या जन्मखुणा, तसेच मावळच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या लेण्या, दुर्ग आणि मंदिराची संपदा जाणून घेण्याकरता रसिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष खांडगे यांनी केले आहे.












