- शहरातील १८५ जणांनी बजावला मतदानाचा हक्क…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यंदा प्रथमच दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्याअंतर्गत एकूण १८५ जणांचे मतदान करून घेण्यात आले आहे. मतदान करण्यास मतदान केंद्रापर्यंत नेऊ न शकणाऱ्या दिव्यांग व ८० वर्षापुढील वयोवृद्ध मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान करण्याची प्रक्रिया यंदाच्या निवडणुकीपासून सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित मतदारांना १२ डी फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले.
एकूण १८८ अर्ज थेरगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. त्या अर्जाची छाननी करण्यात आली. प्रत्यक्ष मतदान अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तींच्या घरी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. घरातून मतदान करण्याची गरज असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर गुरुवार (दि. १६), शुक्रवार (दि.१७) आणि शनिवार (दि. १८) असे तीन दिवस त्या व्यक्तींच्या घरी जाऊन मतपत्रिकेवर मतदान घेण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र सहा पथके निर्माण करण्यात आली.
मतदानासाठी टिक किंवा फुली असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यासाठी मतदान केंद्रापर्यंत मताची गोपनीयता पाळण्यात आली. त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. त्यात १८६ मतदार हे ८० वर्षांवरील वयोवृद्ध आहेत. तर, दोघे जण दिव्यांग आहेत. बाहेरगावी गेल्याने तीन जणांचे मतदान झालेले नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.













