- भरारी पथकं, नाकाबंदी आणि दक्षता पथकांची कडक अंमलबजावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्व पक्ष सरसावले आहेत. निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणूक सेलची स्थापना केली. आहे. या सेलच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन केले जात आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात शहर पोलीस दलाच्या वाकड, सांगवी, चिंचवड, रावेत, देहूरोड आणि हिंजवडी या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दींचा समावेश आहे. यामध्ये एकूण ८७ मतदान केंद्र तर ५१० मतदान बूथ आहेत. पोटनिवडणुकीसाठी १२ भरारी पथके, सात ठिकाणी कायमस्वरूपी नाकाबंदी आणि सहा दक्षता पथके नेमली आहेत. यात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सरकारीविभागातील कर्मचारी तैनात केले आहेत.
शंकरराव गावडे स्मृती कामगार भवन थेरगाव येथे स्ट्रांग रूम असून याच ठिकाणी मतदान यंत्रे ठेवली आहेत. मतमोजणी येथेच होणार आहे. केंद्रीय राखीव दलाच्या दोन तुकड्या सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांवर जोर दिला आहे. गुंड प्रवृत्तींनी मतदारांना घाबरवू नये, यासाठी कोम्बिंग, गुन्हेगार तपासणी आदींच्या माध्यमातून कारवाया केल्या जात आहेत. पोलिसांकडून दररोज हद्दीमध्ये पथसंचलन देखील केले जात आहे.
चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात ४७२ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यातील ७३ जणांना सुरक्षेच्या कारणास्तव सवलत मिळाली आहे. तर अन्य ३९९ जणांना आपले पिस्टल पोलिसांकडे जमा करावे लागणार आहे. आतापर्यंत ३२३ जणांनी आपले पिस्टल जमा केले असून आणखी ७६ जण पिस्टल जमा करणे बाकी आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर ही शस्त्रे जमा करावी लागणार आहेत.
१९ जानेवारी रोजी पोट निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली. त्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी १७ अवैध पिस्टल आणि ७९ अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. कोयते, सुरे बाळगणाऱ्या ७८ जणांवर कारवाई केली आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या २६ जणांवर तर २२८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पुढील काळात रेकॉर्डवरील उपद्रवी गुन्हेगारांना तडीपार करण्याचे देखील पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. अवैध शस्त्रांच्या मोहिमेनंतर आता फरार आणि पाहिजे आरोपींना पकडण्याची मोहीमही पोलिसांनी हाती घेतली आहे.













