न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा रोड शो आज भलत्याच कारणांनी चर्चिला गेला. त्यांच्या या शो साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी (दि. २२) रोजी वाकडमध्ये हजेरी लावली. यावेळी “ कमळ फुलू दे ” च्या घोषणाबाजीने परिसर फुलला होता.
वाकड येथील दत्त मंदिराजवळील उत्कर्ष चौकात येताच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांवर फुलांची बरसात करत त्यांचे स्वागत केले. दत्त मंदिर रोडने थेरगावमधील डांगे चौक, दत्तनगर जुना जकात नाका, चिंचवडमधील चापेकर चौक, गांधीपेठ पॉवर हाउस चौक, केशवनगर, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूल, कुणाल हॉटेल पासून पुढे विमल गार्डन समोरून शिवेंद्र लॉन्सपर्यंत त्यांनी भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री उघड्या गाडीतून लोकांना अभिवादन करत निघाले तेव्हा नागरिकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. या रोड शोमुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विशेषतः तरुणाईची तुफान गर्दी उसळली होती. याचा मोठा फायदा उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना होईल, अशी शक्यता आहे.
यावेळी खा. श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
















