- लक्ष्मणराव व्हीलचेअरवर मतदानासाठी आले; त्यांना देवेंद्रजींनी सांगितल होतं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- ” सरकार स्थापन होताना, मला आठवतंय, अतिशय आजारी असताना देखील लक्ष्मणराव व्हीलचेअरवर मतदानासाठी आले होते. हे प्रेम, ही निष्ठा, ही त्यांची जबाबदारी होती. त्यांना देवेंद्रजींनी सांगितल होतं. आपल्याकडे बहुमत होतं. परंतु, नवीन सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्यासाठी आपलं मत देखील दिलं पाहिजे ही भावना ठेवून ते तिथे आले. त्यामुळे त्यांच्याबद्द तो आदर, सन्मान माझ्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणूनच माझ्या मुख्यमंत्री होण्यामध्ये देखील लक्ष्मणरावांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा सहभाग, हिस्सा, प्रेम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी (दि. २२) रोजी पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. त्यांनी वाकडमध्ये भव्य रोड शो केला. त्यानंतर रहाटणी येथील सायंकाळच्या
जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खा. बारणे, भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, आ. खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, इरफान सय्यद आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दुर्दैवाने लक्ष्मणराव आज आपल्यामध्ये नाहीत. परंतु, त्यांची कीर्ती, त्यांचे काम आजही या सभेतील उपस्थितीवरून आपल्याला जाणवतेय. बराच मोठा एरिया आजच्या प्रचारफेरीमध्ये आपण आज पिंजून काढला. त्यावेळी सर्वच समाजाचे, धर्माचे लोकं रस्त्यावर पहायला मिळाले. परंतु, एकाही माणसाचा हात खाली नव्हता. हीच खऱ्या अर्थाने लक्ष्मणरावांच्या कामची पोच पावती आहे. जे काम त्यांच्या मनात होते; काही विकासाचे काम झाले, काही शिल्लक असतील. खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा कायापालट करण्याचं स्वप्न, मतदारांच्या अपेक्ष पूर्ण करण्याचं, मतदारसंघात मूलभूत सोयी-सुविधा देण्याच कामं, अपूर्ण राहिलेलं स्वप्न अश्विनीताईंच्या रूपाने पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहरातील बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर माफ करण्याचा निर्णय विधानसभेत घेतला आहे. त्याचा शासन आदेश तातडीने निघेल. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर आता मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. सिडकोप्रमाणे प्राधिकरणाचा साडेबारा टक्क्याचा विषय तातडीने मार्गी लावला जाईल. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करायला सांगितला आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी देण्याची सूचना केली आहे. पुणे रिंगरोड लवकरच सुरू करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.


















