- १०० कोटींच्या रस्त्ते प्रकल्पाचीही जाहीर सभेत केली पोलखोल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- ‘ महापालिकेच्या शाळांमधील बहुतेक मुले वाहन चालक, शिपाई म्हणून काम करतात. दहावीनंतर ही मुले शिकू शकत नाहीत. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ७०० च्या जागा ७ हजार करा, हे मी महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत सांगत आलो आहे. महापालिकेच्या इमारती मागची चार एकर जागा आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कामासाठी देऊ केली होती. पण, कालच मला एका अधिकाऱ्याने सांगितले की ती जागा आता अग्निशामक दलाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी ठेवतोय. मी त्यांना सांगितले तुम्ही २ मार्च पर्यंत थांबा. ती जागा आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलाच घेऊ.’
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची रावेत येथे जाहीर सभा झाली. या सभेत कलाटे बोलत होते. त्यांचे निवडणूक चिन्ह शिट्टी आहे. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राहुल कलाटे म्हणाले, पाणी, अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न दोन्ही पक्षांनी सोडविला नाही. माझ्यासमोरील दोन्ही उमेदवारांपैकी एकही जण पाच वर्षात कधी महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या विरोधात बोलल्याचे मला आठवत नाही. या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आता भाजपची सत्ता आहे. मग कोणता प्रश्न सुटला? अनधिकृत बांधमकामाच्या प्रश्नावर सर्वजण सत्तेत आले. सुटला का तो प्रश्न ? ज्यावेळी प्राधिकरणाच्या जमिनी ‘ पीएमआरडीए’ मध्ये गेल्या. जो विकसित भाग आहे, तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. आम्ही सांगत होतो कि हे हस्तांतर करताना संबंधित घरे नागरिकांच्या नावावर करा. पण आजही हा प्रश्न सुटलेला नाही, असेही कलाटे म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगवी ते मामुर्डीपर्यंत सर्व ठिकाणी पाणी प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २४ तास पाणी देऊ असे सांगितले होते. भाजप सत्तेत आला. त्यांनी पाणीपुरवठा दिवसाआड केला. पुनावळ्यातील नागरिकांसाठी निगडीतून २८ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. सगळीकडे पाणी टंचाई असल्याने कृत्रिमपणे हा पाणी प्रश्न निर्माण केला का? एकीकडे टँकर माफिया आहेत. वाकड, पुनावळे परिसरात १०० कोटी रुपयांचे रस्ते करायचे मी ठरविले. त्यावेळी मतदानाच्या जोरावर भाजपने हे रस्ते करायचे नाकारले. पण, हे रस्ते आम्ही राज्य सरकारकडून मंजूर केले. आज ते रस्ते पूर्णत्वास येत आहेत. महापालिकेची सीबीएसई बोर्डाची पहिली शाळा वाकडला बांधत आहोत. आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहातो म्हणून निवडणुकीला आम्ही उभे राहायचे नाही का ? माझ्या विरोधकांच्या प्रचाराला पिंपरी, भोसरी, मावळ येथून लोक धरून आणावे लागतात. मतदारसंघाचे भवितव्य ठरवत असताना वारस निवडायचा अधिकार कुणाला आहे ? हा वारस निवडायचा अधिकार नागरिकांना आहे, असेही कलाटे म्हणाले.
२०१४ ला मी शिवसेनेचा उमेदवार होतो. त्यावेळी तुम्ही मला ६५ हजार मते दिली. २०१९ ला या मतदारसंघात कोणीही लढायला तयार नव्हते. भाजपची मोठी लाट लोकसभेनंतर जाणवत होती. मला एक लाख १२ हजार मतांचे पाठबळ दिले. मला पाठिंबा दिलेले म्हणत आहेत कि ती मते आमची होती. परंतु, अॅड. प्रकाश आंबेडकर कधीही असे म्हणाले नाहीत कि ती मते आमची होती. ती मते जनतेची होती असेच ते म्हणतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर नागरिक नाहीत. पण, आमच्याबरोबर आहेत. महापालिकेत पाच वर्षे गटनेता म्हणून काम केले. त्यावेळी प्रत्येक चुकीच्या कामाला कडाडून विरोध केला. हे सर्व करण्यासाठी तुमच्यातील आमदार हवा. माझ्याबरोबर कोणता नेता नसला तरी माझ्याबरोबर नागरिक आहेत. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला जनता पोटनिवडणुकीत धडा शिकवेल आणि मला मोठा मताधिक्याने निवडून देईल, असा आत्मविश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सभेत व्यक्त केला.


















