- ९५ वर्षांच्या आजीबाईंनी अनं ८४ वर्षांच्या आजोबांनीही बजावला मतदानाचा हक्क..
- दुपारी चार नंतर मतदानाचा टक्का वधारण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला मतदारांचे स्वागत करून सुरुवात झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवारी (दि. २६) रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी २०.६८ टक्के आहे. दुपारी उन्हाचा तडका असल्यामुळे मतदार घरातच थांबून आहेत. त्यामुळे दुपारी चार नंतर मतदानाचा टक्का वधारण्याची शक्यता आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार आहेत. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान मतदान शांततेत, सुरळीतपणे आणि उत्साहाच्या वातावरणात सुरु आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेब कास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवले जात आहे. या कक्षाला निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही मतदान केंद्रांना देखील ते भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.

थेरगावातील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय हे सखी मतदान केंद्र हे महिलांच्या दिमतीला सज्ज ठेवले आहे. तसेच वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर विशेष सहायकासह व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. ते देखील मताधिकार बजावत आहेत. निवडणूक निरीक्षक एस सत्यनारायण यांनी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील सखी मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच रावेत येथील भोंडवे शाळेत तयार करण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रात देखील भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे..मताधिकार बजावल्यानंतर मतदार सेल्फी काढण्याचा आनंद घेत आहेत. ८४ वर्षांच्या महादू विठोबा वाल्हेकर तर, ९५ वर्षे वयाच्या आजीबाईंनी देखील आज मतदानाचा अधिकार बजावला आहे.












