- पोटनिवडणुकीत गतवर्षी पेक्षाही कमी केवळ ५०.४७ टक्के मतदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली होती. पोट निवडणुकीसाठी सुमारे ५०.४७ टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघात मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे मतदानाच्या सरासरी टक्केवारीवरुन दिसून येत आहे.
केवळ १,५७,८२० पुरुष मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. तर, १,२९,३२१ महिलांनी मतदान केले. इतर ४ जणांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ पैकी केवळ २,८७,१४५ मतदारांनी पोटनिवडणुकीत मतदान केले आहे. यात पुरुष मतदारांची सरासरी ५२.१, महिला मतदारांची सरासरी ४८.६२, तर इतर ११.७६ अशी एकूण ५०.४७ मतदानाची टक्केवारी आहे. दोन मार्चला म्हणजेच गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आज रविवारी संपन्न झाली. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली. परंतु सहाच्या आतमध्ये मतदान केंद्रात आलेल्या नागरिकांचे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरु होते. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी यायला उशीर झाला.
गत वर्षी चिंचवडमध्ये ५३.३२ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा त्यापेक्षाही कमी मतदान झाले आहे. दरम्यान सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.२५ टक्के मतदान झाले होते. तर सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २०.६८ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.५५ टक्के एवढी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४१.०६ इतकी मतदानाची टक्केवारी होती. एकूण झालेल्या अंतिम मतदानाची सरासरी टक्केवारी ५०.४७ इतकी झाली.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. निवडणूक मैदानात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसह तब्बल २६ अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी एकूण ५१० केंद्रांवर मतदान झाले. सांगवीपासून ते देहूरोडजवळील किवळे-मामुर्डी, असा सुमारे २० किलोमीटर अंतराच्या परिसरात मतदारसंघाचे क्षेत्रफळ व्यापले आहे. पवना नदी काठावरील दाटवस्तीमुळे मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यात पुरुष ३ लाख ४१५ व महिला ३ लाख १ हजार ६५० तर, तृतीयपंथी ३५ मतदार आहेत. मात्र, पोटनिवडणुकीत तेवढे मतदान झाले नाही. एकूण झालेल्या मतदानात युवा मतदारांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक असल्याने निवडणुकीत त्यांचा कौल अधिक महत्वाचा ठरणार आहे. मतदानाचा टक्का घसरल्यामुळे ज्या उमेदवाराला दीड लाखांच्या आसपास मतं मिळतील तो उमेदवार विजयी होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे तरुण मतदारांच्या हातात भावी आमदाराचे भवितव्य दडले आहे.


















