न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त एक या पदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शासनाला पत्र पाठविले. भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांचीच अतिरिक्त आयुक्त एक पदी प्रतिनियुक्ती करण्याची मागणी असल्याने अतिरिक्त आयुक्तपदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
राज्य सरकारने १ सप्टेंबर २०१४ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नवीन आकृतिबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. यापूर्वी महसूल सेवेतील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती होत होती. परंतु, रेल्वे सेवेतील विकास ढाकणे, राज्य कर सेवेतील प्रदीप जांभळे, मुख्याधिकारी संवर्गातील स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. जांभळे यांची महाराष्ट्र प्रशासकीय लवादने (मॅट) नियुक्ती रद्द केली. त्यांच्या जागी झगडे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. पण, जांभळे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याने वाद काही केल्या संपुष्टात येत नाही.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त एक या पदावर प्रतिनियुक्तीने राज्य शासनाकडून वेळोवेळी नेमणूक करण्यात येईल, असा अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील असावा. अतिरिक्त आयुक्त दोन या पदावर शासनाचे सह सचिव, उपसचिव दर्जाचे, मुख्य अधिकारी (निवडश्रेणी) किया समकक्ष वेतन श्रेणीतील अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल. याप्रमाणे नव्याने पद निर्मिती करुन अतिरिक्त आयुक्त पदाची नेमणूक अर्हता व वेतनश्रेणी दुरुस्तीसाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली आहे.


















