- अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या फलकबाजीमुळे चर्चांना उधाण..
- ‘लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली’ केवळ हीच प्रचारनीती कामी येईल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२३) :- चिंचवड विधानसभेचा निकाल उद्या गुरुवारी (दि. २) रोजी जाहीर होणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या बहुतांशी एक्झिट पोलने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनीताई जगताप ह्याच विजयी होतील, असा कल वर्तविला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे नाना काटे आणि राहुल कलाटे यांचा अनुक्रम आहे. त्यातच काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी मतमोजणी आधीच अश्विनीताई जगताप यांच्या विजयाचा फलक लावला आहे. त्यावर चिंचवड विधानसभा आमदार पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक रविवारी (दि. २६) रोजी पार पडली. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही या पोटनिवडणुकीला सामोरे गेले. २८ उमेदवारांना एकूण २ लाख ८७ हजार ४७९ इतके मतदान झाले. हे प्रमाण ५०.५३ टक्के इतके आहे. प्रमुख सत्ताधारी भाजपने या निवडणुकीत रंगत आणली. भाजपच्या ४० स्टार प्रचारकांनी कधी नव्हे इतकी चिंचवड मतदारसंघात भाजपची हवा केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभांनी मतदारसंघाचे वातावरण अवघे भाजपमय केले होते. त्यांच्यापुढे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे देखील काही चालली नाही. कारण काहीही असो, परंतु त्यांनी उमेदवारासाठी जाहीर सभा घेण्याचे टाळले. भाजपच्या जोरदार आक्रमणामुळे यंदाचे मतदान रेकॉर्डब्रेक होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, झाले उलटेच. सभेला असणाऱ्या गर्दीने मतदानासाठी गर्दीच केली नाही. मुख्य रस्त्याच्या पलीकडे असणारे बाहुबली आ. अनं शहराध्यक्ष यांचीदेखील जादू पोटनिवडणुकीत मतदानासाठी करिश्मा करू शकली नाही, अशी कुजबूज त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती.
मतदानाच्या टक्केवारीत गतवर्षी पेक्षाही काहीसी घट झाली. त्यामुळे झालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार ही पोटनिवडणूक पक्षकेंद्रित नव्हे तर व्यक्तीकेंद्रित झाल्याची स्थिती दर्शवतेय. टक्केवारी ही अधिकांश वाढली असती तर, मात्र जनतेने बदलावाला मतदान केले, असा कयास काढता आला असता. परंतु, मतदानाची टक्केवारी गतवर्षीपेक्षा किंचितशी घटली. त्यामुळे सर्व घडामोडी पुन्हा दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर येऊन थांबतात. त्यामुळे ‘लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली’ केवळ हीच प्रचारनीती अश्विनीताई यांच्या कामी येईल, अशी शक्यता दिसतेय. जनतेला त्यांनी घातलेली भावनिक साद किती परिणामकारक ठरतेय हे उद्या समजेलच. परंतु, आज चौका-चौकात लागलेले फलक निश्चितच त्या परिस्थितीकडे घेऊन जातात की, वेगळेच फाटे फोडतात हे जनता जनार्दनाने दिलेल्या मतदानावरच ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.


















