- विजयानंतर लक्ष्मणभाऊंच्या स्मृतिस्थळी माय लेकी गहिवरल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांच्या मुलीने लक्ष्मण जगतापांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी माय-लेकींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थितांनी ‘अमर रहे, अमर रहे, लक्ष्मण जगताप अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.
अश्विनी जगताप लक्ष्मण जगताप यांनी अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर डोकं ठेवलं. त्यावेळी त्या भावनिक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झालं. यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी जगताप यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीच्या मृत्यूच्या दुःखाने अश्विनी जगताप यांच्या डोळ्यात पाणी आले. अश्विनी जगताप यांच्यानंतर त्यांच्या मुलीनेही स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन वडिलांना आदरांजली वाहिली. मात्र, आईनंतर तिलाही भावना अनावर झाल्या आणि तिलाही अश्रू अनावर झाले. यानंतर महिला कार्यकर्त्यांनी तिलाही सावरलं.
अश्विनी जगताप म्हणाल्या, “ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला, पण सिंह गेला. लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे. राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अश्विनी जगताप म्हणाल्या, “नक्कीच, राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा मला फायदा झाला.”












