न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) जाधववाडी सेक्टर १२ येथील परवडणाऱ्या घरांची दस्त नोंदणी (रजिस्ट्रेशन) सहा मार्चपासून होणार आहे. त्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थी सदनिकाधारकांना ४९ हजार ७०० रुपये तर अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) लाभार्थी सदनिकाधारकांना एक लाख १६ हजार ८०० रुपये ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहेत. दस्त नोंदणीच्या चार दिवस आधी ही रक्कम भरणे आवश्यक आहे.
या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील चार हजार सदनिकांची दस्त नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदनिकांचा शेवटचा हप्ता (१०० टक्के रक्कम) भरलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या सदनिकांचे रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे
अंतिम वाटपपत्रात दर्शविलेल्या हप्त्यांची १०० टक्के रक्कम सदनिकाधारकांनी भरणे आवश्यक आहे. तसेच तात्पुरते वाटपपत्र व अंतिम वाटपपत्रात नमूद केलेल्या नमूद रकमांचे हप्ते भरण्यास झालेल्या विलंबाच्या कालावधीसाठी ५.४८ टक्के (वार्षिक दराने) दंडनीय व्याजाची रक्कम भरणे बंधनकारक आहे. अशी रक्कम भरल्यानंतरच सदनिकांचे रजिस्ट्रेशन करण्यात येईल.
सदनिकांच्या रजिस्ट्रेशननंतर सोसायट्यांची नोंदणी होईल. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात येणार आहे. त्याची तारीख सोसायटीच्या नोंदणीनंतर जाहीर करण्यात येणार आहे.
सदनिकेच्या रजिस्ट्रेशनसाठी लाभार्थी व सहलाभार्थी या दोघांनी मूळ पुराव्यांचे व इतर कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड यांच्याशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक ओटीपीसाठी सोबत आणावा. – मनीषा कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए…












