जागतिक महिला दिनी, औंध मिलटरी स्टेशनमध्ये कर्तबगार महिलांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन आणि २४ मराठा लाइट इंफेट्री, शिवनेरी ब्रिगेड, यांच्या संयुक्त विद्यमाने औंध मिलटरी स्टेशन येथे हा सोहळा पार पडला. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे व २४ मराठा लाइट इंफेट्रीच्या संचालिका सुमती अय्यर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या सेवेबद्दल प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
या दरम्यान ” सायक्लॉथॉन आणि रन फॉर फन ” या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी शिवनेरी ब्रिगेडच्या संचालिका नि. मेजर डॉ. अनु श्रीनिवासन, उद्योजक संजयशेठ भिसे, आनंद हास्य क्लब पिंपळे सौदागरचे प्रमुख राजेंद्र जसवाल आणि समस्त महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, समाजकारण, राजकारण, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांत महिलांनी आतापर्यंत जी प्रगती केली आहे, ती साजरा करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. समाजात आपल्या कार्यामुळे आज अनेक महिला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. आजच्या महिला चूल आणि मूल या चाकोरीतून बाहेर येत सर्वच क्षेत्रात कर्तबगारी दाखवत आहेत. आपल्या कार्याने त्या इतर महिलांना देखील प्रेरित करीत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न केला.
२४ मराठा लाइट इंफेट्री च्या संचालिका सुमती अय्यर यांनी देशात अनादी काळापासून महिलांना सन्मान दिला जातो. आज महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. आगामी युग महिलांचे असून पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील, असे मत व्यक्त केले.
पिंपळे सौदागर येथील पि के इन्टरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सीपल धनश्री सोनवणे, महिला वकील मुग्धा खान्देशी, महिला डॉ. प्रांजली पाटील, गृह उद्योजिका अन्नपुर्णा ओझा, महिला किर्तनकार हभप संगीताताई येनपुरे – चोपडे, योग शिक्षिका शोभा मिरचंदानी, आध्यात्मिक योग शिक्षिका रीना वसन, राजयोगा शिक्षिका ब्रह्माकुमारी वर्षा, समाजसेविका शर्वरी गावंडे, महिला इंजिनिअर प्रगती महाले, महिला ब्युटिशियन शिल्पा लड्डा, डे-केअर संचालिका श्वेता चौधरी, पुणेरी आवाजच्या आर जे, तेजस्विनी, प्रोफेसर डॉ. दिपाली धाईंजे, तृतीयपंथी भूषण मोरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.















