न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आल्याचा निर्णय अनपेक्षित असून, या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला. कसब्यातील निवडणूक निकालाचा संदर्भ देत येत्या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सूत्र कायम रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीचा कसब्यातील यशस्वी प्रयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारला आपल्या वैधतेची शाश्वतीही नाही. तसेच राज्यकर्त्यांविरोधात वातावरण असल्यामुळेच राज्य सरकार महापालिका, पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहेत. त्यातून लोकशाहीचा गळाच घोटला जात असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे. आता ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानातून भाजपविरोधी जनमत आणखी घट्ट होईल असाही विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला.















