न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मार्च २०२३) :- हिरो स्प्लेंडर (एमएच४१बीडी२६३९) वरून फिर्यादी हे (दि. ७) रोजी रात्री ७.३० च्या सुमारास बेबडआहोळ येथे जात होते. गाडीचे पेट्रोल रस्त्यामध्ये संपल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला भोतेवस्ती येथील जवळच असणा-या एच.पी. पेट्रोल पंपावर नेली. बाटलीमध्ये पेट्रोल घेतले. फोन पे वरून पैसे स्कॅन होत नव्हते. त्यामुळे पेट्रोल पंपावर काम करणा-या मुलाला फिर्यादी हे ‘ माझ्या मोबाईलमधून स्कॅन होत नाही, त्यामुळे मी पैसे नंतर देतो; नाहीतर बाटलीतील पेट्रोल ठेवून घे, मी पैसे घेवून आल्यानंतर मला पेट्रोल दे ‘ असे म्हणाले. त्यांचे बोलणे चालू असताना फिर्यादीच्या पाठीमागे उभ्या असलेल्या ग्रे रंगाच्या कारमधील (नंबर माहीत नाही) कारचा चालक खाली उतरला. फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. येथून निघून जा असे म्हणाला.
फिर्यादी त्याला माझे पेट्रोलचे पैसे देण्यावरून बोलणे चालू आहे, तुम्ही काही संबंध नसताना शिवीगाळ का करता असे म्हणाले. त्यावेळी आरोपी त्याच्या गाडीकडे गेला. गाडीतून लोखंडी रॉड काढून फिर्यादीकडे आला. लोखंडी रॉड त्याने फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या कानावर मारला. त्यात त्यांच्या डाव्या कानाला जोरात फटका बसल्याने त्यांच्या कानातून रक्त येवू लागले, कानाला जबर दुखापत झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी दिपक रामदास देवरे (वय २५ वर्षे, धंदा-नोकरी, रा. कैलास चौधरी यांचे भाडयाचे खोलीत, इंडीयन पेट्रोपलं पंप शेजारी, बेबडओहोळ, ता. मावळ, जि. पुणे.) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी आरोपीविरोधात ७४ / २०२३ भादवि कलम ३२६,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे


















