न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- चिंचवड येथे दरवर्षी कै. मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे या वर्षीही प्रभागातील महिलांसाठी मनीषा स्मृती निवास, भोईर नगर, चिंचवड येथे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होम मिनिस्टर तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व महिलांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. महिलांसाठी विविध खेळ तसेच स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये वेगवेगळ्या खेळांच्या ७ फेऱ्या झाल्या त्यामधून २१ जण अंतिम फेरीसाठी निवडून खेळविण्यात आले, त्यासोबतच प्रश्नोत्तरे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महिलांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत बक्षिसे पटकावली.
प्रसिद्ध भाऊजी मधुसूदन ओझा यांनी त्यात अजूनच रंगत आणली. कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षीस अश्विनी जोशी (स्मार्टफोन), दुसरे अनिता गायकवाड (कुलर) तर तिसरे पारितोषिक सुनिता राठोड यांनी पटकाविले. यावेळी सर्व सहभागी तसेच इतर उपस्थित महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक तसेच पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा किरण हर्षवर्धन भोईर व त्यांचे स्नेही यांच्या हस्ते प्रभागातील ७ नूतन बचत गटांचे उदघाटन करण्यात आले. महिला बचत गट सदृढ करण्यात नेहमीच सहाय्य करणार असल्याचे किरण भोईर यांनी उपस्थितांना सांगितले.
कार्यक्रमास भारती पाटील, मंगल ढगे, प्रतिभा कंकाळे, अर्चना बोरसुने, रत्ना शेगर, सुप्रिया भिंगारे, अनिता गायकवाड, मनीषा शहा, मीनाक्षी पोईपकार, लता चौघुले, तसेच प्रभागातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


















