- महापालिकेचा प्रशासकीय राजवटीतील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) सादर होईल. सद्यस्थितीत महापालिकेमध्ये प्रशासक आहे. त्यामुळे हा प्रशासकांचा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. महापालिकेचा ४१ वा, तसेच आयुक्त शेखर सिंह यांचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत तयार केलेल्या या अर्थसंकल्पातून शहरवासीयांना काय मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, गतवर्षी एकूण ४९६१ कोटी ६५ लाख व केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रुपयांचे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये यंदा वाढ होणार की घट होणार, तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना नवीन काय मिळणार? याबाबत उत्सुकता आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पावर तत्कालीन सत्ताधारी भाजपची छाप होती. मात्र, आता नगरसेवकांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासक आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने संपूर्णतः प्रशासकांची छाप अर्थसंकल्पावर असणार आहे. त्यामधून शहरवासीयांना काय मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
अर्थसंकल्पासाठी मंगळवारी १४ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत आयुक्त शेखर सिंह हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत, अशी माहिती जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखाधिकारी यांनी दिली.
















