न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- महापालिकेच्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. प्रशासकीय राजवटीतील पंधरापैकी सुमारे बारा प्रकल्प मागील पानावरून पुढील पानांवर आले आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेवर छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यापैकी १२ प्रकल्प यापूर्वी मंजुरी दिलेले आणि त्यातील काही कामे पूर्ण झालेले आणि काही अपूर्णावस्थेत आहेत.
चिंचवड स्टेशन येथील सिटी सेंटर, मोशीचे नवीन मोशी रुग्णालय, आकुर्डीतील नवीन मध्यवर्ती ग्रंथालय, मोरवाडीतील दिव्यांग पुनर्वसन केंद्र, चिखलीतील टाऊन हॉल, मासूळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय, थेरगावातील कॅन्सर हॉस्पिटल, चिंचवड स्टेशनमधील मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरीतील मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, प्रकल्प मागील पानावरून पुढील पानावर आले आहेत.
नदी सुधारचे घोंगडे गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. आता नदी सुधारचा पहिल्या टप्प्यातील डीपीआर झाला आहे. महापालिका हद्दीतून वाहणा-या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम कर्जरोखे उभारून करण्यात येणार आहे.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी कर्जरोखे उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार, कर्जरोख्यांमार्फत नदी सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पात त्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रारंभिक टप्प्यात मुळा नदीसाठी २०० कोटींचे कर्ज कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
















