न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे मेट्रो व दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकडून येणारी जड-अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातील काम पूर्ण होईपर्यंत हे बदल असणार आहेत. याबाबत पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत.
मुंबईकडून पुणे शहराकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना मुकाई चौकातून रावेतमार्गे तसेच ‘भूमकर चौक, वाकड नाका येथून राजीव गांधी पुलावरून पुण्याकडे जाण्यास बंदी आहे. ही वाहने मुकाई चौकातून सरळ चांदणी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.
मुंबईकडून पुणे शहराकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना सर्व्हिस रोडने भूमकर चौक, वाकड नाका, राधा चौक येथे जाण्यास बंदी आहे. ही वाहने भूमकर चौक, वाकड नाका, राधा चौक ओव्हर ब्रीजने सरळ चांदणी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून आलेली मुंबईकडून पुण्याकडे जाणारी जड अवजड वाहने सेंट्रल चौकातून पुढे चांदणी चौकमार्गे अथवा दापोडी हॅरिस ब्रीजमार्गे पुण्याकडे जातील.
















