न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- H3N2 Virus आता किती धोकादायक ठरू शकतो याचा आतापर्यंत डॉक्टर आणि जाणकार केवळ अंदाज बांधत होते. पण गेल्या काही दिवसांपासून या विषाणूने आपला खरा रंग दाखवायला सुरूवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात H3N2 च्या संसर्गामुळे भोसरीतील ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मयत रुग्णावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
संबंधित रुग्णाला सर्दी, खोकल्याची लक्षणं होती. रुग्णाची H3N2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला.
शहरात सध्या एकाही रुग्णाला H3N2 च्या संसर्गाची बाधा झालेली नाही, अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


















