- नव्या योजनेद्वारे पाच लाखांचे कव्हरेज; कुटुंबातील इतर सदस्यांनाही फायदेशीर योजना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- साडेनऊशेहून अधिक प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून केल्या जातात. सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरलेल्या या एमजेपीजेएवाय योजनेच्या खर्चाची मर्यादा शासनाने दीड लाखाहून पाच लाख केली आहे. या योजनेतून उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, मर्यादा वाढली असली तरी खासगी रुग्णालयांना विमा योजनेकडून मिळणारे पॅकेज मात्र, पूर्वीप्रमाणेच असणार आहे. या अर्थसंकल्पात योजनेची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली असली तरी या नवीन मर्यादिचा वापर सुरु होण्यासाठी आणखी ६ ते ७ महिने लागणार आहेत. त्यासाठी करावे लागणाऱ्या बजेटची तरतूद व इतर प्रक्रिया पार पाडण्यासाठी हा वेळ जाईल.
एमजेपीजेएवाय ही राज्यातील ९९८ खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये आहे. त्यासाठी केवळ आधारकार्ड किंवा कोणतेही एक ओळखपत्र आणि रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी) किंवा महाराष्ट्रातील रहिवासी पुराव्याची गरज पडते. वर्षाला एका कुटुंबासाठी दीड लाख रुपयांपर्यंत उपचार करता येतात. सध्या वर्षाला एकाच रुग्णावर उपचार करताना योजनेचे दीड लाख रुपये तत्काळ संपतात. मात्र, नव्या योजनेतून त्यांना पाच लाख रुपयांचे कव्हरेज देण्यात आले असून, ती रक्कम एकाच रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना वापरता येणार आहे.
सध्या या योजनेची खर्चाची मर्यादा ही वर्षाला दीड लाखाची आहे. म्हणजे एखाद्या पेशंटने जर त्या योजनेतून उपचार घेतले व त्याचा खर्च दीड लाख झाला व त्याला आणखी इतर उपचारांची गरज पडली किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्याला त्याचवर्षी उपचार करण्याची गरज पडली तर योजनेतून उपचार होत. मात्र, आता मर्यादा वाढल्याने एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना पाच लाख संपेपर्यंत त्याचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आजारांवर मोफत उपचार योजनेतून हृदयाचे बायपास,अँजिओप्लास्टी, व्हॉल्व्ह बदलणे, मेंदुविकार, मेंदू शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, गुडघा व खुबा प्रत्यारोपण. मणक्याचे ऑपरेशन, बाळांचे उपचार, अपघात झालेल्या रुग्णांचे उपचार अशाप्रकारे ९६० प्रकारचे उपचार मोफत होतात.