- महापालिकेच्या उत्पन्नात भरघोस वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना शास्ती कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे मूळ कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून, सात हजार ७४२ नागरिकांचा तब्बल १४३ कोटी ६३ लाख रुपयांचा शास्तीकर माफ झाला. त्यामुळे अनेक वर्षांपासून शास्तीसाठी थकलेला कर जमा झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नातही ५३ कोटींची भर पडली आहे.
शासनाकडून यापूर्वी १ हजार चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांचा शंभर टक्के शास्ती माफ झाला. त्याचा सर्वाधिक ६६ हजार ८३ बांधकामांना लाभ झाला. त्यानंतर १ ते २ हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना ५० टक्के शास्ती माफी दिली. शासनाने यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे निवासी बिगरनिवासी सर्वच बांधकामांना शास्ती माफी मिळाली आहे. यामध्ये एकूण ३१ हजार ६१६ अवैध बांधकामांचा एकूण ४६० कोटी रुपयांचा शास्ती कर पूर्णपणे माफ झाला आहे. शास्ती कर माफ होणार असल्याने मूळ कराचा भरणा करून शास्ती कर माफ करून घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे.
आतापर्यंत सात हजार ७४२ नागरिकांनी मूळ कराचा भरणा केला आहे. त्यांनी ५३ कोटी १० व लाख ८४ हजार ३१६ रुपये मूळ कर भरला आहे, तर मूळ कराचा भरणा केल्याने १४३ कोटी ६३ लाख ८९ हजार ३५० रुपये अवैध शास्ती कर माफ झाला आहे.
शास्ती कर माफ झाल्यामुळे नागरिकांनी मूळ कर भरण्यास सुरुवात केली. त्याचे प्रमाणपत्रदेखील विभागाच्या वतीने ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मूळ कराचा भरणा करून शास्ती माफीचे प्रमाणपत्र काढून घ्यावे.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग