- वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी; लिपिक दिलीप आढेची उचलबांगडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला. अँटीकरपशन अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागामध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना या विभागातील टेंडर क्लार्क दिलीप आढे या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
ठेकेदार बराटे यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. महापालिकेतील तिस-या मजल्यावर प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांची स्थायी समितीची सभा सुरु झाली होती. त्याचवेळी एसीबीने छापा टाकला.
स्थायी समितीच्या बैठकीत बसलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिका-याला बैठकीतून बोलावून घेतले. बंद दाराआड त्यांची चौकशी सुरु होती. पैसे घेण्यात या दोघांचाही समावेश आहे का? याची चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाणी पुरवठा व जलनि:सारण विभागात लाचलुचपत विभागाची ही दुसरी कारवाई आहे. एसीबीच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
















