न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केटी’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी आज (दि. २३) सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी उद्या (दि. २४) सकाळी ११ ते दुपारी २.३० वा. विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.
अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकासह जमा करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.