न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- इंद्रायणी नदीच्या परिसरातील तळवडे गायरानात डीअर सफारी पार्क उभारण्याचा प्रस्ताव पंधरा वर्षांपासून आहे. त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मात्र, त्या आरक्षणात आता बदल करून, डीअर पार्क ऐवजी बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आरक्षण करण्याबाबतचा निर्णय महापालिका स्थायी समिती सभेने घेतला.
महापालिका भवनात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. त्यात आरक्षणाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. डीअर पार्क करण्याबाबतचा अभिप्राय वनविभागाला महापालिकेने मागितला होता. त्यांचा नकारात्मक अभिप्राय आल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी केली व आरक्षणच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोडायव्हर्सिटीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकारी प्रशासकांना देण्यात आले आहेत.
तळवडेतील आरक्षणात डीअर पार्क (हरिण पार्क) उभारण्यास वनविभागाने नकार दर्शविला आहे. या परिसरात औद्योगिक परिसर वाढत असून भविष्यात मानवी हस्तक्षेप वाढू शकतो. तो हरणासारख्या प्राण्यांसाठी पोषक राहणार नाही, असे अभिप्राय वनविभागाने दिला आहे.
















