- सीएसआर फंडातून चष्मे वाटपाचे नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीमध्ये एक हजार विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदोष असल्याने या विद्यार्थ्यांना पुढील काळात चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.
ऑक्टोबर २०२२ पासून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे एक हजार विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदोष आढळल्याने त्यांना सीएसआर फंडातून चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या शहरात १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये दोन्ही विभागात सुमारे ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी नेत्रदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. ज्यांना डोळ्यांचाआजार नाही, अशाही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी आणि चष्मे वाटप करण्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांच खर्च आहे. हा खर्च सीएसआर फंडातून केला जाणार आहे. त्यासाठी सीएसआर फंड उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांसोबत संपर्क साधण्याचे काम सध्या सुरू आहे.
काही कंपन्यांकडे या कामी शिक्षण विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्या कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येताच चष्मे वाटप प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असे उपायुक्त खोत यांनी सांगितले.
















