न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- दहावीचा पेपर देऊन घरी जात असताना चौघांनी एका मुलाचा मोबाईल नंबर फिर्यादी मुलाला मागितला. नंबर न दिल्याने आरोपींनी व अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवला. फिर्यादीचा रस्ता अडवुन त्यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच याच पध्दतीने याच अनोळखी मुलांनी फिर्यादीचा मित्र किसन रमेश आडसुळ यास देखील बेकायदेशीर जमाव जमवुन डांगे चौक बस स्टॉप येथे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने श्रेयश मारुती कस्पटे (वय २० वर्षे रा. कस्पटे वस्ती वाकड), अथर्व गणेश कस्पटे (वय १८ वर्षे रा. छत्रपती चौक वाकड), तीन ते चार अनोळखी मुले, विधीसंघर्षीत बालक (वय १६ वर्षे रा. छत्रपती चौक, वाकड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार (दि. २५) रोजी दुपारी १.३० ते १.४५ च्या दरम्यान काळेवाडी बसस्टॉप, काळेवाडी फाटा येथे घडला. वाकड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २८२ / २०२३ भा.द.वि. कलम ३२३, ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.