- अनेक इच्छुकांनी संपर्क कार्यालयं केली बंद; मतदारांकडे फिरवली पाठ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त लागत नसून, त्या दिवाळीत होण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून खर्च करून मोर्चेबांधणी करणाऱ्यांची दमछाक झाली असून, अनेक इच्छुकांनी संपर्क कार्यालय बंद केली असून, काही इच्छुक दिसेनासे झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकार असताना प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले होते. फक्त निवडणुकीची तारीख जाहीर होणे बाकी राहिले असताना महाविकास आघाडी सरकार बरखास्त होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले; मात्र अद्यापही निवडणुका जाहीर होत नसल्याने इच्छुकांची दमछाक झाली आहे.
निवडणुकीसाठी इच्छुकांनी गेल्या दीड वर्षांपासून गावोगावी खेळ रंगला पैठणीचा, तुळजापूर, कोल्हापूर दर्शनवारी, वारकऱ्यांच्या सन्मान अशा विविध उपक्रमांवर भर दिला होता. यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले होते. परंतु निवडणूक पुढे ढकलल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विविध उपक्रमांची स्पर्धा जोरात दिसून आली.
काही इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून मतदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्या दिवाळीपासून प्रभागात विविध वस्तूंचे वाटप केले होते. मात्र निवडणूक प्रकिया आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याने इच्छुकांपैकी काहीजणांनी कार्यालय बंद केली आहेत.
मतदारांकडे फिरवली पाठ…
अनेक इच्छुकांनी आत्तापर्यंत लाखोंनी खर्च करून निवडणुकीची तयारी केली आहे. ‘अभी नही तो कभी नही’ ही घोषणा करत निवडणूक जाहीर होण्याअगोदर प्रचाराला सुरवात केली. परंतु, निवडणुका पुढे जाण्याचे संकेत मिळताच इच्छुकांनी खर्चाला कात्री लावली.