न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे अग्निशामक केंद्र उभारण्यात आले. पण, उद्घाटना अभावी हे अग्निशामक केंद्र चालू होऊ शकले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. हे केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी मोशीकरांनी केली आहे.
गेली सहा ते सात महिन्यांपूर्वी श्री नागेश्वर महाराज अग्निशामक केंद्र, मोशी या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. पण, उद्घाटन रखडले आहे. यामुळे हे केंद्र मोशीकरांच्या कुठल्याच फायद्याचे नाही. मात्र, अशा परिस्थितीत मोशीत आगीचे प्रकार घडल्यास कोण जबाबदार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोशीच्या कचरा डेपोत आगीच्या दुर्घटना घडतात. ही आग विझवण्याकरिता अग्निशामक दलाच्या गाड्या वायसीएम किंवा कुदळवाडी या केंद्रातून मागवाव्या लागतात. त्यांना ३० ते ४० मिनिटे लागतात. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केलेले असते. पण, मोशीतील अग्निशामक केंद्र चालू झाल्यास गाडी ५ मिनिटांत पोहोचेल आणि आगीवर नियंत्रण मिळू शकते. त्यामुळे हे केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
















