न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- पिंपरी- चिंचवड शहर परिसरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील दोन महिन्यांत २१३ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मात्र, शहरात चोरलेल्या दुचाकी नेमक्या कशा आणि कोठे जातात, हे पोलिसांना न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातून बाहेर जाणाऱ्या मुख्य चौकात सतर्क नाकाबंदी लावली आहे. तसेच, ट्रॅव्हल्स आणि भंगारची दुकाने तपासण्याचे आदेश दिले आहेत.
चोवीस तास वाहनचोरीच्या तुलनेत गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या वाढत्या गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी १२ मार्चपासून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. २४ तास ही नाकाबंदी असणार आहे.
संशयित दुचाकींची कसून तपासणी करण्यात येत आहे. विनानंबर प्लेटची दुचाकी तपासली जात आहेत. प्रभारी अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त दिवसातून दोन वेळा नाकाबंदी ठिकाणी भेट देत आहेत. चोरलेल्या दुचाकी लक्झरी बसद्वारे शहराबाहेर किंवा राज्याबाहेर घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी शहराबाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक लक्झरी बसचे लगेज व कॅरिअर पोलिसांकडून तपासले जात आहे. यामध्ये दुचाकी मिळून आल्यास पोलिस कागदपत्रांची मागणी करतात. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास पोलिस संबंधितावर कारवाई करू शकतात.
चिखली परिसरातील भंगार दुकानांमध्ये चोरलेल्या दुचाकी स्क्रॅप केल्याची माहिती पोलिसांकडे आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता भंगारची दुकानेदेखील चाचपडण्यास सुरुवात केली आहे. अचानक पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. भंगार दुकानात सीसीटीव्हीच्या सूचना पोलिसांनी व्यावसायिकांना दिल्या आहेत.