- भक्ती-शक्ती समूह शिल्पाच्या धर्तीवर शिल्पाभोवती होणार विद्युत रोषणाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आळंदी बीआरटीएस मार्गावर चऱ्होलीजवळ संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज भेटीचे समूह शिल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या शिल्पाभोवती विद्युत रोषणाई व प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.
निगडीत जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित भक्ती-शक्ती समूह शिल्प उभारण्यात आले आहे. हे शिल्प राज्यात प्रसिद्ध झाले आहे. या समूहशिल्पाच्या धर्तीवर आळंदी रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समूह शिल्प उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात झाले होते. तेव्हापासून हे काम कासवगतीने सुरू आहे.
संत व वारकऱ्यांच्या शिल्पांना महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाकडून मान्यता मिळण्यास विलंब झाल्याचे कारण पालिका प्रशासन पुढे करीत आहे. त्यामुळे काम रखडल्याचे अधिकारी सांगतात. शिल्पाभोवती नव्याने उद्याने विकसित करण्यात आले आहे. हे सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आहेत.
शिल्पाच्या भोवती विद्युत रोषणाई व प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाने ६० लाख खर्चाची निविदा ऑक्टोबर २०२२ ला प्रसिद्ध केली होती. त्यात तन्वी इलेट्रिक अॅण्ड इंजिनिअरींग, अर्थव इलेक्ट्रकल्स, ओम एकदंता इलेक्ट्रकल्स व शांती इलेक्ट्रीकल्स या चार ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. तन्वी इलेक्ट्रोटेडची १९.८९ टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली आहे. त्यानुसार ४८ लाख १ हजार ४४२ रुपये खर्च होणार आहे. कामाची मुदत एका वर्षाची आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.















