- लक्ष्मी गॅस इंटरप्रायजेस मधील प्रकार; एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२३) :- रहिवासी भागात लोकांच्या जीवास धोका निर्माण करुन घरगुती गॅसचा काळाबाजर करणा-या इसमास गुन्हे शाखा युनिट १ ने अटक करीत त्याच्याकडून लहान-मोठया घरगुती गॅस टाक्यांसह ४८,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भगतवस्ती, साधना कॉम्पलेक्स, भोसरी येथील लक्ष्मी गॅस इंटरप्रायजेस दुकानात पडताळणी दरम्यान एक जण घरगुती गॅसच्या मोठ्या टाकीमधील गॅस लहान टाक्यांमध्ये भरुन विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली.
परमेश्वर दयानंद माने (वय-२६ वर्षे रा. सचिन माने यांचे घर, धावडेवस्ती, रवी लांडगे यांचे घरजवळ, भोसरी; मुळ रा. आंबेगाव ता देवणी, जि लातुर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन १० घरगुती गॅसच्या मोठ्या टाक्या, २८ गॅसच्या लहान टाक्या, एकुण ३८ गॅस टाक्या, २ गॅस विड्रॉल मशीन, एक वजनकाटा असा एकुण ४८,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी माने हा गॅस चढया व्यावसायीक दराने विक्री करत होता.
त्याच्या विरुध्द भादवी कलम २८५ सह जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३७ सह पुरवठा व वितरण नियमन आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार फारुक मुल्ला. प्रमोद हिरळकर, विशाल भोईर, मारुती जायभाय, स्वप्नील महाले यांनी केली आहे.
















